मदत
"देवा ते प्रेस नोट झाली का हो तयार?"
"करतोय साहेब"
"ती कॉन्फरन्सची पावती फाडा काय असल ती. पाकीटासहीत प्रेस्नोट देऊन टाका"
"हो साहेब"
"ते आपलं ल्याबराडार कुठं खपलंय? फोटोसहीत कव्हरेज पाह्यजे म्हणाव. नुसती हाडकं चघळाया पाय्जेत"
"सांगतो साहेब"
"ते फाउंडेशनचं काय लागतय का पत्ता?"
"साहेब तेनी बीड ला हायत म्हणं कार्यक्रमाला"
"बघावं का सांगून दादासाहबाकडून?"
"नको साहेब, कव्हरेज तेनीच खातेत, आकडा बी आधीच द्यावा लागतो म्हण"
"राव्ह दे राव्ह दे. आपन हाव हितं. आपनच करायचं"
"हो साहेब"
"ते आमचे शेक्रेट्री कुठं खाजवत बसलेत, पाठवा जरा."
"हो साहेब"
.................
"कामाच्या टायमाला कुठं हिंडता राजे?"
"हाय की साहेब, जरा ते पत्ते लिहून काढीत होतो"
"किती निघालेत?"
"बावीस हायत. आकडा मेन्शन करावा का?"
"नाय नाय. बावीस म्हणजे मोठा खुट्टाय राव, परहेड कमी करावं लागतील"
"मग कसं करावं? चेक तयार करुन घेतो."
"ठिकाय. नावं टाकून ठिवा. फिगर नंतर सांगतो. पाकीटात शिस्तीत पॅक करा. कार्यक्रम होस्तवर फोडू दिवू नका"
" होय साहेब"
"स्टेजचं कसं?"
"ते धाकटे सरकार बघतेत"
"बर बर. पिंट्याकडून मारुन घ्या. तेचे मागचे बी द्यायचेत. सगळं एकदम देऊ म्हणाव"
"हो साहेब"
"बघा जरा तुमीच जाउन, आमचं धाकलं जरा सर्कीट हाय"
"हो साहेब"
......................
"काय म्हणतेत रं?"
काय नाय. ते स्टेजचं"
"कितीला ठरलं?"
"सत्तर "
"आन डिजिटल?"
"डिझाइन पायी थांबलय"
"आर्र काय असातय बे. एक साईड मस्तपैकी फास टाकायचा, हिकडं डोस्क्याला हात लावलेला गडी टाकायचा. खतम"
"हेडलाइन द्या म्हणतेत"
"आर लिहि की, दुश्काळाला साथ, आमचा हात"
"जरा येगळा अर्थ होतय ओ त्यातून"
"अर्थ वाचत नसतेत बे कोण. लिहि कायतर हर्दिक मदत बिदत"
"नुसती दुश्काळ्ग्रस्ताना मदत लिव्ह्तो"
"वेटेज आलं पाह्यजे भौ. जंगी दिसला पाह्यजे बॅकड्रॉप"
"हो साहेब"
"रस्त्यावर दोन होर्डिंग, स्टेजसमोर एक, खांबावर पन्नास. रिक्षावर पन्नास. किती होईल?"
"साठ सत्तरची लेवल हुईल की"
"करा"
"साहेब ते आलेल्यांची उतरायाची कशी करावी व्येवस्था?"
"वरच्या दोन हॉलमधी कर सगळ्याना अॅडजस्ट"
"आमदार हैत त्यादिवशी एसी ला. गोंधळ हुइल."
"बेसमेंटला थांबेव मग"
"हो साहेब"
"ते पेपरच्या जाहीरातीचं झालं का? कीती लागतील?"
"दोन द्यावे लागतील आत्ता"
"करा करा. ते मस्ट हाय बघा"
"ही ताटली बाटली ग्यांग"
"पन्नास दिले साहेब"
"ते चॅनेलचे बोलला का"
"येतय टायमावर. दिलेत तेला बी"
"आपले साह्य्बाचा ड्रेस आन जाकीट?"
"येतय."
"टायमावर फेशेल कराया पाठीव"
"हो साहेब"
"ती अँकर आयटम कोण रे? सांगितला का तिला?"
"ती न्हाय म्हणती आता. दुसरी हाय. मेकपसहीत १५ म्हणतीय"
"देऊन टाक. रौनक नाय येत तेच्याबिगर"
............................
"साहेब ते काय मदत करणारेत असं इचारत आलेत"
"मदतीचा हात हाय तो. मोजत नस्ताव आम्ही सांग"
"न्हाई, संघटनेतर्फे तेनी बी देऊ म्हणतेत"
"काय नको. कारखान्याच्या इलेक्षनला हेनीच मारलेत आपली. आता आपली आपनच गाजवायची"
"स्टेजवर हारगुच्च तरी"
"कोन दिसाया न्हाय पाह्यजे. फकस्त आपन न आपले"
"ते मदत द्यायची ते"
"खाल्लाकडं उभं कर, सत्कार वगेरे आटपले की एकेक सोडायचे"
"ती रडनारी मावशी?"
"ते कॅमेर्याच्या टायमाला तिला आन"
"साहेब ती चेकवर फिगर टाकायची राह्यलीय."
"आता लिव्ह कायतर पाच साहा. टोटल मिळून एकवर जाऊ दिवू नको. ऑलरेडी लै खर्च झालंय"
"हो साहेब. सह्या राह्यल्याती"
"घे कुनाच्या तर. आप्ल्याच पतसंस्थेचा तर हाय चेक."
"हो साहेब"
................................
स्थानिक वार्ताहरः आजच शहरात संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात दुष्काळ्ग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबियांना मदतीचे वाटप करण्यात आले. ह्या कार्यक्रमास आपल्या शहरातील मान्यवर______
______
______
______
______
______
याच कार्यक्रमाशेवटी बळीराजाप्रती असणारी आपली सामाजिक बांधिलकी अधिक वृध्दिंगत होण्यासाठी सढळ हस्ते मदतीचे आवाहन करण्यात आले.
.................................
Comments
Post a Comment