सैराट आन सैराटच

रात्रीचा १२ चा शो आणि भागवतटॉकीज ची फरशीबी दिसणार नाही एवढी गर्दी, पार्कींगचे पाचही थेटरचे लॉट फुल्ल भरलेले. हाउसफुल्लच्या काउंटरवरची हुज्जत. सगळी गर्दी १८ ते ३० मधलीच. जणगणमनला उभारलेल्या पब्लिकने काळ्या स्क्रीनवर रंगीबेरंगी सैराट अक्षरांनाच दिलेल्या शिट्ट्या. त्या काळ्या स्क्रीनवरच्या पाट्यातल्या नागराज पोपटराव मंजुळे नावाला झालेला डब्बल जल्लोष. लका आपला माणूस. पाट्या पडतानाच मागे टेनिसबॉलची क्रिकेटमॅचची गावठी कॉमेन्ट्री सुरु झालेली. कॉमेन्ट्रीला सोता नागराज बसलेला गच्चीवरच्या पॅवेलिनला. एकच फाइट वातावरण टाइटचे फ्लेक्स, तीनचाकी सायकलच्या बक्षीसाची अनाउंसमेन्ट, लोकल बिली बाउंडिंगला मॅचमधूनच घरी हाकलत नेणारी आजी, प्रिन्स लिहिलेली नंबरप्लेट, पितळी पिस्तुलाची चावी आणी पुढं तलवारीची नंबरप्लेट असलेली बुलेट वाजवित युवानेते आगमन केले आणि आमच्या हितलीच स्टोरी असल्याची खात्री पटली.
म्याचमध्ये गरज असताना आपला हिरो पाणी हापसत हिरवीनीसमोर नजर लावून बसलेला. दिसायला देखणंय लका. पिक्चरपुरती बॉडी कमी केलीय म्हणा पण तब्येत केली तर हाय मटेरिअल हिरोचे. शेवटच्या ओव्हरीत मॅच जिकून देतय आणि बक्षीस घेतय गावचे भाग्यविधाते आणि सर्वेसर्वा पाटलांकडून. हापसताना जिच्यावर नजर लावली ती हेचीच पोरगी. अजून तर झलक नाही आली. पण स्कॉर्पिओतून उतरताना दिसलीच. मजबूत लका काम पण डोळे काय म्हणतोस. अगागागागा. पाटलाची लैच लाडकी लेक आर्ची बुलेट घेऊन कॉलेजात येतीय. हिरीत पवायलेल्या पोरांना नीट बाहेर हाकलून स्वतः पोरीना घेऊन उतरायचा थाट अंगात. तिच्याबी मनात हे कोळ्याचं परश्या भरतंय.
परश्याच्या डोक्यात तर आर्ची सोडून काहीच नाही, नुसतं नाव ऐकलं तिचं तरी गडी सैराट सुटतोया. परश्याचे जिगर दोस्त म्हनावं तर दोनच. लंगडा प्रदीप आन गॅरेजवाला सल्ल्या. त्येंनी भरीस पाडून चिट्ठ्या बिठ्या प्रकरण होतंय. आता दोन्ही साइडनी ओके असतयच तवा लीड आटोम्याटीक आर्चीकडंच. शेतातल्या, फोनवरच्या गप्पातून जातीय फुलत ही स्टोरी.
आर्चीच्या भावाच्या म्हणजे प्रिन्स च्या बड्डे पार्टीला हे तिघं जातेत झिंगाट नाचायला. काय राव थेटरातला जल्लोष. पोलीसानी दांडके मारुन पब्लिक पडद्यासमोरुन हाकललं तवा कुठं थांबलेला पिक्चर सुरु झाला.
आर्चीच्या घरामागं एका बेसावध क्षणी दोघांना आर्चीचा बाप बघतो. कुत्र्यासारखा मार खाउन तिघे परत येतेत. प्रशांतरावांची उचलाबांगडी नीट करमाळ्याला. हिकडं रितीरिवाजापरमाणं आर्चीला बघायला पाव्हणे आलेलेच. परिस्थितीचा अंदाज घेऊन आर्ची करमाळ्याला परश्याला भेटायला येती. तिथे काय सपोर्ट मिळत नसल्याने पळ काढतेत. पाटलाची माणसं जीव खाउन मागं असतेतच. परंड्याला पोलिसांकच्या तावडीत सापडून परत आणले जातेत. पोलीस स्टेशनात परश्या आणि त्याचा मित्रांवर रेप आणि किडनॅपचा चार्ज बसतोय हे कळाताच आर्चीला बापाचा मनसुबा कळतो. स्टेटमेंट फाडून बाहेर पडताच इकडे पाटलाकडून परश्याला जबरी मारहाण होत असती. जिगरीची आर्ची तेथून परश्याला घेऊन पळ काढती.
खिशात पैसे नाही. कोन ओळखीचे नाही आशा अवस्थेत हैदराबादला पोचलेल्या दोघांवर यायची ती संकटे येतेतच. एकमेकाच्या साथीने निस्तरत एका भल्या बाईची पडती गाठ. फाटका का हुईना पण आसरा मिळतो. आक्खं आयुष्य थाटात काढलेल्या आर्चीला हे असलं गरीबीचं जगणं पेलवणं तर अवघड होतय पण ती मागं हटत नाही. कष्टात वाढलेल्या परश्याला ही असली जिंदगी सवयीची असली तरी आर्चीसारखा निखारा पेलवत नाही. बिनलग्नाचा सुरु झालेला संसार भांड्याला भांडे वाजवतोच. बारक्या सारक्यावरुन वाढलेल्या भांडणात आर्ची बापाच्या घराकडे परत यायला निघती. प्रवासात जाणवती ती संसारातल्या साथीची आन विश्वासाची किंमत. हिकडे गळ्याला फास लावून घ्यायला निघालेला परश्या थांबतो आन आर्ची परत येती.
एकेक दिवस सरतो आन दोघांचे दिवसबी पालटतेत. डोश्याच्या गाडीपासून चांगली नोकरी मिळवणार्‍या परश्यासोबत आर्ची पण नोकरीत प्रमोशन मिळवीत जाते. कायदेशीर लग्न बिग्न केलेल्या ह्या दोघांत पिल्लू आकाशचे बी आगमन होते. हैद्राबादेत थाटात आक्टीव्हावर नवर्‍याला आणि मुलाला घेउन फिरणारी आर्ची सगळ्यात जास्त शिट्ट्या खाउन जातीया राव.
.
आता म्हणताल आक्खी स्टोरीच टाकली का देवा, तर पिक्चरमध्ये भावला हाच प्रामाणिकपणा. कुठंबी आडमाप नाही की काय हातचं राखलेलं नाही. स्टोरी टेलींग म्हणत्यात नाही का या कलेला. अगदी १०० मार्काने बोर्ड फाडून पास ओ आमचा नागराज. अशी रियल्ल स्टोरी की भिडलीच पाह्यजे. आता कायजणांना नाय झेपली. नसंना का. अस्मितेचे, प्रतिष्ठेचे आन संपत्तीचे गॉगल लावून बसल्यावर काय दिसतं त्येच दिसणार त्येना. जिंदगीच्या उन्हातान्हात फिरणार्‍यांना आपली सावळी का हुईना पण जीव लावणारी आर्ची आठवती. आता नसना का ती शिरेलीतली गोग्गोड पण जिगर बघा की भौ. भाषा म्हणताल लै गावठी पण आसच बोलतो ओ आम्ही. आसच बोलतो आन राहतो पण. झिंगाटवर थिरकले पाय तर बिघडलं काय? पिच्चर संपताना थेटरमध्ये एक तर पावलाचा आवाज येतो का? मग...
आन स्टोरी सांगताना जगावी तरी कीती ह्या माणसांनी? ती आर्ची, लका वर्गात परश्याला बघाया पळत येता येता थांबती तव्हा बघायचा चेहरा. काय असती हूरहूर, काय ती नजर. लाख रिटेक मारावे बॉलीवूडने पन अशी नजर आणावी. च्यालेंज है भौ. सजणाची स्वारी आली म्हणताना आलेली लाज, परत फिरती परश्याकडं तवा आलेली समज सगळं कसं आपल्या डोळ्यानं बोलती राव आर्ची. परश्या बी तसलच. कुठंच हिरोगिरी न दाखवता भिडतय मनाला. डोश्याच्या गाडीवर सराइतपणे वर हात टेकून डोसे मारणं असू दे की निर्दयी मार खाउन आलेला बावरलेपणा. सगळा कसा अस्सल.
परशाच्या जानी दोस्त प्रदीप. लंगडं हाय पण दिमाग का दिमाग. आर्चीनंतर सगळ्यात जास्तीच्या शिट्ट्या घेतल्या की गड्याने. सल्ल्या बी परफेक्ट. गावागावात सापडतेत असले दिलदार जिगरयार.
होतेत...... अगदी असल्या स्टोर्‍या प्रत्येक गावात होतेत. वय असतं ते. मार खाउन कुणी गप्प बसतं नायतर गाव सोडतं, कुणी जीवलगाचा हात धरुन पैलतीरी लागतं. प्रत्येक आर्ची परश्याच्या नशीबात येणारी स्टोरी हाय ओ. याड लागलेल्यांची स्टोरी सांगीतली मन लावून तवा तर कुठं समद्याना याड लागलं. ते म्हणतेत ना. जेवढं पर्सनल होतय तेवढं युनिव्हर्सल होत जातय. आता ही सैराट स्टोरी कशी होतीया दिसतीच हाय ना.

Comments

  1. अभ्या, इतक्या वर्षांनी आज वाचले रे हे. अप्रतिम लिहिलं आहेस. डोळे भरून आले आहेत वाचताना. 2017 नंतर काहीच कसे लिहावेसे वाटले नाही? की आणखी कुठे लिहीले आहे?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मालकीण

पॉईंट झीरो