Posts

Showing posts from 2016

कासव

"ए बामणा, मुत्त्या बोलावतंय बघ आमचं तुला. बघ काय म्हणतंय येड्या भोकाचं" "तुझैला तुझ्या तीन एकर. बापंय कीबे तुझा" "बाप नाय डोस्क्याला ताप हाय" आप्पा कोरे म्हणजे अ‍ॅक्चुअली डोस्क्याला ताप कॅटेगरीतलाच. पण त्याच्या पध्दतीने विचार केला तर ताप. नायतर मुत्त्या वागायला सरळ. दिवसभर बारक्या दुकानात गोळ्या चॉकलेटं अन कुरकुरे विकायचा. खरा धंदा व्ह्यायचा पुड्या सिगरेटीवर पण पाटी यल्लम्मा किराणा दुकान अशीच. सकाळी कपाळाला फासलेली इबित्ती घामाच्या ओघळात वाहून जाईपर्यंत धंदा व्ह्यायचा. जसा दिवस बुडायला लागायचा तसं दुकान आप्पाच्या मित्रांनी भरायचं. येस्टीड्रैव्हर बाशा, आर्मीमन आवचार, पुजारी ग्रामोपाध्ये आणी अशाच चारसहा बिलंदरांनी दुकान भरवलं की झ्याट गिर्‍हाईक फिरकायचं नाही तिकडं. ह्यांच्या सगळ्यांच्याच बुध्द्या अचाट. कुणाला कसं घोळात घेतील सांगता येणार नाही. बायाबापड्यां तर संध्याकाळच्याला तिकडं फिरकायच्याच नाहीत. असल्या आप्पा कोरेचंं गाबडं म्हणजे श्रीशैल. आमचं दोस्त. बापाचा इरसालपणा जरा कमीच उतरलेला लेकात. बापलेकाचं पटलंही नाही कधी. "का बे शिर्‍या, मो

पॉईंट झीरो

"मम्मे, बुटं कुटं फेकलीसा?" इनशर्ट करत करत रव्या बोंबलला "न्हाय माय, म्या कशापायी टाकू. ते दावेदारानं नेलं का उचलून बघ माय" "तिज्यायला न्हेऊन्शानी, कायतर सोड म्हण" एक सापडला बाहेरच्या खाटंखाली, दुसरा न्हाणीच्या चुलीमागं. तिथलंच फडकं मारल बसून तोपर्यंत फवं न च्या आला. एक घास फव्याचा न एक घोट चाचा करणार्‍या लेकाला न्हाहाळत बसली माय. काळं का असना पण रव्या नाकीडोळी देखना. नाकाडोळ्यापेक्षा नजरंत भरायचा बेगुमानपणा. बारीक मशीन मारलेल्या आर्मीकटला उचलून धरायची दणक्या छाती. खांदं कधी पुढं आलं नाहीत. कायम ताणलेली न भरलेली छातीच पुढं करणारा रव्या म्हनजे त्याच्या मम्मेचा नानीमांने दिलेला ताईतच जणू. नास्टा आटपला तशी बॅग अडकवली न बुटं वाजवत रव्या भाईर पडला. गल्लीत चार रामराम ठोकत अन धा घेत रव्या नीट कट्ट्यावर आला. तितक्यात मोरे अंमलदार आलाच बुलेट वाजवत. "चला रविसर, लावू तुमच्या कामाचं कायतरी" म्हणत दोन बोटं टपरीकडं दाखवली. रव्या नीट टपरीच्या आश्क्याकडनं दोन पिवळे गांधीबाबा घेऊन बॅकसीटवर बसला. फाट फाट धुर फोडत मोरेची बुलेट ठाण्याकडं निघाली. "

जी नाईन

रस्त्यात कालवा इतका झाला की शंकर्‍या उठलाच. खाटेवर टेकलेल्या बूडाचा आधार घेउनच अशी गिरकी फिरली की पाय खाटेखालच्या बुटावर आले. स्लीव्हलेस टीशर्टाचे खांद्यावरचे दोन कोपरे बोटाच्या चिमटीत पकडले गेले. एक हिसका देऊन दोन्ही हात सवयीने कानावरच्या केसातून फिरले. हात फिरले म्हणण्यापेक्षा हात जागेवर राह्यले, मान पुढे मागे झाली. बुटाची चेन ओढली गेली. मोरीतल्या पाण्याचा हबका तोंडावर बसला तसे ते ओले हात परत एकदा केसावर फिरवून शंकर्‍या खोलीबाहेर पडला. रस्त्यावर नेहमीचाच सीन. मामाच्या कॅन्टीनसमोर एक अ‍ॅक्टीव्हा आडवी पडलेली. टिपटाप युनिफॉर्मातला एक गोमटा जीव मम्मी कशी रिक्षावाल्याशी भांडतेय हे पाहतोय. रिक्षावाला तर गल्लीतला सत्याच होता. गर्दीला आवडणारा परफॉर्मन्स अगदी बिनचूक पार पडला जात होता. शंकर्‍याने गर्दीत घुसताच आवाज दिला. "अय मॅडम, जरा तमीजसे बात करना. गरीब हुये तो भी इन्सान है हम" भांडून त्रासलेल्या अन शिव्याचा स्टॉक संपल्याने गोंधळलेल्या मॅडमने शंकर्‍याकडे पाहिले. गर्दीने हसायला सुरुवात केलीच होती ती आता नवीन सीनसाठी सरसावली. "अरे ये तो नीलम है. क्या मॅडम पहचाना

बाप हाय मी

"बरं मग वकीलसाहेब, आलं समदं ध्यानात? ह्येच्यापुढं मी काय सांगू नये, तुमी इचारु नये" "लका, वकीलसाहेब झालो नंतर, आधी जिगरयार हौत. चड्डी घालता येत नव्हती तवापासून दोस्ती आपली" "म्हणूनच. म्हणूनच... चल लाग आता कामाला, लै लेट बी झालाय, वैनीसाब वराडतील" "झोप तू बी. डोळे लेन्स लावल्यागत झालेत लालभडाक" "झोपेचं तेवढं सोडून बोल. ती ग्येली आता कायमची, निघ तू" ................. "नाग्या, सगळं घीवून ये बे वर" "मालक, वैनीसाब येते म्हणतेत वर, कसं करु?" "झोपा म्हनाव त्येंना. तू ये घीवून. च्यायचं आकरामाशी" ************************** तिज्यायला कोनाय बे आकरामाशी. कोन म्हणतंय? समोर ये उंडग्या. नाही उभा जाळला तर पाटलाचं रगात नाय सांगणार. ए नाग्या.... कुठं पळाला? आकरामाशी औलाद पळालीच का अशी? आनतो का आता? आन आन. भर नीट. नीट भर आयगल्या. नीट. हां. चल निघ. भईर थांबायचं. चल. .... .रामराम पाटील. कसं चाल्लंय? लै भारी वाटतंया आं बसून दारु प्याया? प्या...प्या. आपल्याच कारखान्याची गेलेली आसंल तिकडं. तितंबी रिमिक्स करतील आय

सैराट आन सैराटच

रात्रीचा १२ चा शो आणि भागवतटॉकीज ची फरशीबी दिसणार नाही एवढी गर्दी, पार्कींगचे पाचही थेटरचे लॉट फुल्ल भरलेले. हाउसफुल्लच्या काउंटरवरची हुज्जत. सगळी गर्दी १८ ते ३० मधलीच. जणगणमनला उभारलेल्या पब्लिकने काळ्या स्क्रीनवर रंगीबेरंगी सैराट अक्षरांनाच दिलेल्या शिट्ट्या. त्या काळ्या स्क्रीनवरच्या पाट्यातल्या नागराज पोपटराव मंजुळे नावाला झालेला डब्बल जल्लोष. लका आपला माणूस. पाट्या पडतानाच मागे टेनिसबॉलची क्रिकेटमॅचची गावठी कॉमेन्ट्री सुरु झालेली. कॉमेन्ट्रीला सोता नागराज बसलेला गच्चीवरच्या पॅवेलिनला. एकच फाइट वातावरण टाइटचे फ्लेक्स, तीनचाकी सायकलच्या बक्षीसाची अनाउंसमेन्ट, लोकल बिली बाउंडिंगला मॅचमधूनच घरी हाकलत नेणारी आजी, प्रिन्स लिहिलेली नंबरप्लेट, पितळी पिस्तुलाची चावी आणी पुढं तलवारीची नंबरप्लेट असलेली बुलेट वाजवित युवानेते आगमन केले आणि आमच्या हितलीच स्टोरी असल्याची खात्री पटली. म्याचमध्ये गरज असताना आपला हिरो पाणी हापसत हिरवीनीसमोर नजर लावून बसलेला. दिसायला देखणंय लका. पिक्चरपुरती बॉडी कमी केलीय म्हणा पण तब्येत केली तर हाय मटेरिअल हिरोचे. शेवटच्या ओव्हरीत मॅच जिकून देतय आणि

पोश्टरबॉईज

इलेक्शनचे पोस्टर्स, बॅनर्स, बॅजेस अन स्टीकर करुन करुन डोस्कं पार कामातनं गेलेलं. तीन पगाराचा ओव्हरटाइम काढला पण महिनाभर डोळ्यासमोर नाचलेले उमेदवारांचे ते मुर्दाड चेहरे हलायचे नाव घेईनात. पार सुम्म होऊन तीन दिवसाची सुट्टी मारली. पैला दिवस सरेस्तोवर मालकाचा फोन. "ये प्रेसला पटकन" "जमणार नाही. इलेक्शनचे अर्जंट काम तर नीट्ट करणार नाही" "अर्रर्र इलेक्शन आग्याद आपी. कन्नड नाटक बंदद. बर्री लगोलगो." अरारारारा. चला उठा राष्ट्रवीर हो. प्रेससमोर दोन ४७४७ बोलेरो लागलेल्या. आत जाताच मालकाने जावई असल्यागत माझी ओळख करुन दिली. "इदे नोडरी डिझाइनर. हेळ सावकारु येन्बेकु" एक कार्यकर्ता लगेच "येन्स्वामी, आरामरी?" करुन सलगी दाखवता झाला. "मालक ह्याना सांगा मला कन्नड येत नाही, परत तरास नको" हा व्युहाचा सुरुवातीचा भाग. "चालतयरी कलाकार, पर्वा इल्ला, स्टार्ट मारा तुमी. आमाला येतय की तुमचं मराठी तोडंतोडं" "द्या आप्पा मजकूर? "मजगूर? येनु?" "कागद ओ. लिव्हलेला" "ते म्हणता व्हय. आद आद. तगोरी" मजक
दिव्यचक्षु अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीच्या ऐसी केबिनात सगळ्यात सामसूम पीसीवरच्या स्क्रीनसमोर सगळ्यात शेवटच्या अ‍ॅड डिझाईनच्या सगळ्यात शेवटच्या टॅगलाईनवर मी काम करतो. रास्टर फोटोशॉप अन् व्हेक्टर कोरलवर अनिर्बंध सत्ता चालते ज्याची आणि कम्प्युटर ग्राफिक्सध्ये ज्याचे चालतात हात डिझाईनर पॅडवर हवे तसा माऊस वळवत तो मी एज्युकेटेड क्रियेटिव्ह डिझाईनर. एजन्सीचे मालक सतत नजर ठेवतात पाठलाग करतात चुकलेली प्रुफे घेऊन चुका काढतात स्वतःलाच न कळणार्‍या स्क्वेअरसेमीच्या व्यवहाराचा एकटाच हा शत्रू. डिझाईनर होतोय क्रियेटिव्हली नि:संतान. गडगंज क्लायंट आणतो आधीच फसलेली येडझवी स्कीम एखादी मोठ्या कॅम्पेनिंगची काल्पनिक कारंजी उसळतात जाहीरातींचे लेआऊटवर लेआऊट प्रिंटतात नव्या कन्सेप्टची कुदळ मारली जाते पुन:पुन्हा रडतो डिझाईनर टेबलावर डोके ठेवून एका मास्टरस्ट्रोक कन्सेप्टच्या जन्माची प्रार्थना करतो. आर्टिस्ट. व्हिज्युअलायझर, मेंटॉर.
ताल ठाक ठण्ण ठाक आवाजाने विजू उठला, भीमसू बारक्या पितळी हातोडीनं संबळ ठोकत होता. बापाला कितींदा सांगितलं अंधाराचं दिवाबत्ती तर कर म्हणून. आयकायचं रक्तातच नाही. गार पाणी डोक्यावर ओतून विजूने कापडं हुडकायला सुरुवात केली. शाळेचा गणवेशाच्या चड्डीवरच मंडळाने दिलेला शर्ट घालूस्तवर भीमश्या कवड्यानी सजलेली अन कुंकवानं माखलेली पडशी घेऊन बाहेर झाला. पहाटेच्या अंधारातच बापलेकानी देवळाच्या बाहेरुन हात जोडले. देवडीचा चिंचोळा जिना चढून बसताच गाभारा उजळलेला दिसला. हरीभटजी काकड्याला सुरुवात करायला अन चौघडा वाजायला गेली ५० वर्शं तरी खंड पडलेला नव्हता. .. आभाळ गुलाबी व्हायला लागलं तसं भीमश्याचं हात भरु भरु आलं. कसंबसं आवरुन विज्याला घेऊन मंडपासमोर आला. भीमश्याच्या डोळ्यासमोर लक्षीच दिसायली. लेकराला पदरात टाकून गेली बिचारी. शिकवू म्हणायची लेकराला. काय करावं आन काय न्हाय. दोन टायमाचं खाणं निघायचं. आता हे पोरगं आयटीआय करायचं म्हणतंय. कुणाला कौल लावावा काय कळेना. सवाशिण बायासमोर अन गावच्या एकमेव मारवाड्यासमोर आरती फिरवून हरीभटजी बाहेर आला. चार केळं आन धाची नोट भीमश्याच्या पडशीत वरनंच पडली.
मदत "देवा ते प्रेस नोट झाली का हो तयार?" "करतोय साहेब" "ती कॉन्फरन्सची पावती फाडा काय असल ती. पाकीटासहीत प्रेस्नोट देऊन टाका" "हो साहेब" "ते आपलं ल्याबराडार कुठं खपलंय? फोटोसहीत कव्हरेज पाह्यजे म्हणाव. नुसती हाडकं चघळाया पाय्जेत" "सांगतो साहेब" "ते फाउंडेशनचं काय लागतय का पत्ता?" "साहेब तेनी बीड ला हायत म्हणं कार्यक्रमाला" "बघावं का सांगून दादासाहबाकडून?" "नको साहेब, कव्हरेज तेनीच खातेत, आकडा बी आधीच द्यावा लागतो म्हण" "राव्ह दे राव्ह दे. आपन हाव हितं. आपनच करायचं" "हो साहेब" "ते आमचे शेक्रेट्री कुठं खाजवत बसलेत, पाठवा जरा." "हो साहेब" ................. "कामाच्या टायमाला कुठं हिंडता राजे?" "हाय की साहेब, जरा ते पत्ते लिहून काढीत होतो" "किती निघालेत?" "बावीस हायत. आकडा मेन्शन करावा का?" "नाय नाय. बावीस म्हणजे मोठा खुट्टाय राव, परहेड कमी करावं लागतील" "मग कसं करावं? चेक तय