ताल

ठाक ठण्ण ठाक आवाजाने विजू उठला, भीमसू बारक्या पितळी हातोडीनं संबळ ठोकत होता. बापाला कितींदा सांगितलं अंधाराचं दिवाबत्ती तर कर म्हणून. आयकायचं रक्तातच नाही. गार पाणी डोक्यावर ओतून विजूने कापडं हुडकायला सुरुवात केली. शाळेचा गणवेशाच्या चड्डीवरच मंडळाने दिलेला शर्ट घालूस्तवर भीमश्या कवड्यानी सजलेली अन कुंकवानं माखलेली पडशी घेऊन बाहेर झाला. पहाटेच्या अंधारातच बापलेकानी देवळाच्या बाहेरुन हात जोडले. देवडीचा चिंचोळा जिना चढून बसताच गाभारा उजळलेला दिसला. हरीभटजी काकड्याला सुरुवात करायला अन चौघडा वाजायला गेली ५० वर्शं तरी खंड पडलेला नव्हता.
..
आभाळ गुलाबी व्हायला लागलं तसं भीमश्याचं हात भरु भरु आलं. कसंबसं आवरुन विज्याला घेऊन मंडपासमोर आला. भीमश्याच्या डोळ्यासमोर लक्षीच दिसायली. लेकराला पदरात टाकून गेली बिचारी. शिकवू म्हणायची लेकराला. काय करावं आन काय न्हाय. दोन टायमाचं खाणं निघायचं. आता हे पोरगं आयटीआय करायचं म्हणतंय. कुणाला कौल लावावा काय कळेना. सवाशिण बायासमोर अन गावच्या एकमेव मारवाड्यासमोर आरती फिरवून हरीभटजी बाहेर आला. चार केळं आन धाची नोट भीमश्याच्या पडशीत वरनंच पडली. बापाचा हात धरुन विज्या कायबाय सांगत राह्यला. हरीभटजी लेकराला पाठीव म्हणला एवढं लै झालं पण चौघड्याचं कसं. हात तर आताच थरथरु लागलेलं.
..
नेटानं भीमशानं अजून पाच धा वर्शं रेटली. कुकवानं माखलेली पडशी धरायला विज्या मातर नसायचा. तालुक्याला आयटीआय करुन कुटतर इंजिनेरच्या हाताखाली कामाला लागला. महिना पंधरा दिवसानी बापाला पैसे द्यायला तेवढं यायचा. आला की हरीभटजीकडची फेरी चुकायची नाही. भटजीला पण आता सेवा हुइना. त्येंचा धाकटा वृत्ती चालवू लागला. आयुष्याच्या संध्याकाळी दोन म्हातार्‍यांच्या गप्पा देवळाच्या पायरीवर रंगल्या. विज्याचा मोठेपणा आन त्याची कीर्ती भीमश्याला बाहेरुनच कळायची. हरीभटजी मात्र लै कौतुक करायचा विज्याचं. भीमश्याला वाटायचं लेकरु बोलीवतय शहरात. पण चौघडा कसा सोडावा. त्या तालावर तर लेकरु मोठं केलं. देवाची पडशी आयुष्यभर पुरलंच की.
..
सकाळचा काकडा आटपला आन भीमश्या पायरीवरच कोसळला. तीन तासातच विज्यानं बापाला शहरात अ‍ॅडमीट केला. आठवडा दवाखान्यात काढून नीट घरी नेलं. पोराचा थाट पाहून बाप दिपला. घरचं नोकर चाकर बघून बुजला. जसं हातपाय व्येवस्थित हालायला लागले तसा भीमश्याचा गावी जायाचा घायटा वाढायला लागला. रात्र रात्र चौघड्याच्या आवाजानं म्हातार्‍याची झोप उडाली. अपरात्री हातानी कॉटवर वाजवायला लागला. सारखं सारखं हात जोडू लागला. शेवटी विज्यानं गाडी काढली. तासात बापाला देवळासमोरच आणलं.
..
शेंदरी रंगानं मंदीर उजळायला लागलेलं आन तालात चौघडा वाजत होता. बापाला हाताला धरुन द्वाराखाली उभे केले. एका चौघड्यासमोर मशीन बसवलेलं. लाईटीच्या मोटारवर चाकं फिरत होतं. तालावर दांडकी आपटत होतं. शेजारी स्पीकरवर सुंद्री वाजत होती. काकड्याच ताट घेउन हरीभटजीचा भाऊ समोर आला. अरे विजयमालक नमस्कार वगैरे झालं. भीमश्याला म्हणाला मालकांनी मोठंच काम केलं की. मशीन बसवली चौघड्याची. देवळात ट्युब आन पंखे पण दिलेत. तुमचं तर्फे म्हणून नाव दिलय. लेकराचं कौतुक चौघड्याच्या आवाजात बापाला कळेना. कान लावून त्या मशीनीचा ताल मोजू लागलेला.
.
"चला बाबा, हरीकाकांना भेटून येऊ"
"विज्या पोरा ताल बरोबर जमलाय रं पण पडशी राह्यली लका तुझ्या घरी"

Comments

Popular posts from this blog

सैराट आन सैराटच

मालकीण

पॉईंट झीरो