कासव

"ए बामणा, मुत्त्या बोलावतंय बघ आमचं तुला. बघ काय म्हणतंय येड्या भोकाचं"
"तुझैला तुझ्या तीन एकर. बापंय कीबे तुझा"
"बाप नाय डोस्क्याला ताप हाय"
आप्पा कोरे म्हणजे अ‍ॅक्चुअली डोस्क्याला ताप कॅटेगरीतलाच. पण त्याच्या पध्दतीने विचार केला तर ताप. नायतर मुत्त्या वागायला सरळ. दिवसभर बारक्या दुकानात गोळ्या चॉकलेटं अन कुरकुरे विकायचा. खरा धंदा व्ह्यायचा पुड्या सिगरेटीवर पण पाटी यल्लम्मा किराणा दुकान अशीच. सकाळी कपाळाला फासलेली इबित्ती घामाच्या ओघळात वाहून जाईपर्यंत धंदा व्ह्यायचा. जसा दिवस बुडायला लागायचा तसं दुकान आप्पाच्या मित्रांनी भरायचं. येस्टीड्रैव्हर बाशा, आर्मीमन आवचार, पुजारी ग्रामोपाध्ये आणी अशाच चारसहा बिलंदरांनी दुकान भरवलं की झ्याट गिर्‍हाईक फिरकायचं नाही तिकडं. ह्यांच्या सगळ्यांच्याच बुध्द्या अचाट. कुणाला कसं घोळात घेतील सांगता येणार नाही. बायाबापड्यां तर संध्याकाळच्याला तिकडं फिरकायच्याच नाहीत. असल्या आप्पा कोरेचंं गाबडं म्हणजे श्रीशैल. आमचं दोस्त. बापाचा इरसालपणा जरा कमीच उतरलेला लेकात. बापलेकाचं पटलंही नाही कधी.
"का बे शिर्‍या, मोबाईल शॉपीचं काय झालं"
"शेट्ट्ट, मुत्त्या काय दीना रोक्का"
"चैला, चारपाच लाख जड हैत का बे तेला?' कुट ठेवतंय दुकानचा गल्ला साठवून?"
"काय करतंय की काय की. एकच चावी तेच्या पेटीला. ती बी गळ्यातल्या लिंगाला बांधून ठेवतंय"
दोघं गेलो दुकानात तर आप्पा कसल्यातर पोथीत डोस्कं घालून बसलेला. आम्हाला बघून पटदिशी पेटीत ठेवली. कुलुप लावून चावी लिंगात अडकली मग आप्पाने श्रीशैल्याला हुकूम सोडला.
"होग री सुळ्ळीमगा. जरा प्रायव्हेट बोलायचं तुझ्या दोस्तासंगट. चा बी सांग म्हणं. काय देवा? बोलू न्हवं?"
"बोला की आप्पा. काय विषेष?"
"काय नाय ते तुम्ही डिस्कोरी बिस्कोरी बघताम्हणं की टीवीवर?"
"आप्पा त्यात काय एवढं. चांगलं असतंय ते. प्राण्यांच्या शोधांच्या झालंच तर विज्ञानाच्या स्टोर्‍या असतेत"
"बघा की हो. नको कोण म्हणतंय. बामणं हुशारंच ओ. काय बघायचं ते बी हुशारीनं बघतेत. नायतर आमचं कर्टून. रात्रभर मस्ती चनेल बघतंय दिवसा छताला बोचा दाखवत पडतंय"
"आप्पा, द्या की मोबाईल दुकान काढून त्याला. दिवसभर तिथं बसंल"
"ते बघू म्हणं नंतर, पैले सांगा एक्वीसनख्याची तुम्हाला काय म्हैती"
"काय एक्वीस? कसली नखी?"
"कासव असतंय. एक्वीस नख्याचं."
"आप्पा इत्क्या प्रोग्रामात कासवाची नखं काय दाखवली नाहीत बघा. त्याचं काय?"
"ते मिळालं की लक्ष्मी पाणीच भरती हो देवा घरात. तुम्हाला म्हैत नाही व्हय"
"ह्या.. काय बी उगी"
"देवा...उगी न्हवं. आता आपले बापू. त्येंच्या संस्थेचं चिन्ह काये?"
"कासव"
"तेच. आधी बापू काय होतं? उगी आपल्या चारचौघागत हो. एकदा का त्येंना ते एक्वीस नख्यावालं कासव गावलं. निस्ता रोक्काच रोक्का. हटता हटंना लक्ष्मी. मागंल ती इच्छा पूर्ण करतं म्हणं ते कासव."
"काय मागंल ते देतंय?"
"अन मंग. "
"अओ आप्पा त्यांनी वेगळ्या हिसोबानं ठेवलंय ते सिम्बॉल."
" असं कोन ठेवतंय व्हय शिंबॉल? अर्थय देवा त्यात. लक्ष्मी हाय त्यात"
"काय नसतं हो आप्पा तसलं. उगी कायतरी काढू नका. हाय ती लक्ष्मी बक्कळ हाय तुम्हाला. मग तुम्हाला कशाला काय पाहीजे?"
"देवा. मला म्हणजे लेकराबाळासाठीच ओ. दुसरं हाय काय आपलं"
"मग द्या की त्याला दुकानला पैसे"
"जावा देवा, तुम्ही काय उपेगाचं नाही आम्हाला"
...............................
असल्या बाबतीत आप्पा सटीकच. वाघाचं नखच आण, ते चांदीत जाळलं की सोनं होतय म्हण. उदाच्या मागं तर चार वर्षं फिरला. उदाच्या मेंदूची राख लाल कापडात गुंडळून वडाखाली पुरली की पौर्णीमेला त्याच्या आकाराएव्ढा हिरा मिळतंय म्हण. नाही नाही तसल्या पोथ्या अन पुस्तकं आणणार. चार टोळभैरव मित्र कायतरी सांगणार आन हे मुत्त्या करत बसणार. खरंच येड्या भोकाचं. पोरगं साधं दुकान मागतंय ते देईना आणि असले धंदे.
"शिर्‍या, बाप काय देत नाय पैसे तुला दुकानासाठी"
"तिज्यायला बघ की. आता रात्री कुटं त्या बाशाबरोबर कर्नाटकात चाललंय"
"कशाला म्हणं?"
"ह्ये कासवचंच म्याटर असणार कायतर. येकदाचं ते मिळालं तरी आमचं आप्पा देईल का पैसे कुणास म्हैत."
...............................
दुसर्‍या दिवशी आप्पाचं दुकान बंद. संध्याकाळी पण बंद. रात्री शिर्‍या आला.
"चल पटकन. आप्पाचं निरोप आलंय. बिदरला जायचंय"
पटदिशी निघालो. उमरगा, आळंद, बसवकल्याण करुन बिदरला त्याच्या सोयर्‍याकडं पोचस्तंवर सकाळ झालेली. गेल्यागेल्या सोयर्‍यानी क्रुझर काढली. नीट सिव्हिलात गेलो. येस्टीच्या अपघातातले मयत लायनीत पांढर्‍या कपड्यात होते. गळ्यातल्या लिंगाला घट्ट कवटाळून आप्पा शांत झालेला होता. कवटी फुटल्याने आलेले रक्ताचे ओघळ पुसूनही त्याची जाळी उरलेली होती. कागदोपत्री सोपस्कार उरकून बॉडी ताब्यात यायला दोन तास गेले. क्रूझरमध्ये मागे मयतबापा शेजारी श्रीशैल मख्खासारखा बसला. मागचं दार लावताना चार जण सरकारी कानडी आले. परत श्रीशैलच्या सह्या झाल्या. कागदं देण्यात आली.
"कसली कागदं रे श्रीशैल? काय म्हणलं ते कानडीत?"
"अ‍ॅक्सीडेंटचा चेक दिलाय पाच लाखाचा"
बापाची प्रेतकळा आता पोरगा घेऊन बसलेला होता.

Comments

Popular posts from this blog

सैराट आन सैराटच

मालकीण

पॉईंट झीरो