मालकीण

तोंडावरचा पदर हलला तसे सोनीचे डोळे उघडले. अंगावर आवघा जयवंत्या ओणवलेला. दोन केसाळ मजबूत हातं सोनीच्या खांद्यावर रोवलेले. जेसीबीने आर्म रोवून स्वतःला उचलावे तसा झुकलेला जयवंत जरा वर उठला.
"फुकने, दोन दिवसात पैशाची सोय बघाया सांग हांडग्याला. डीलर मागं लागलाय. डिलीव्हरी देतो म्हंतय लगीच"
"आरं करनार तरी कसं, तुझी भूक मोठी, येवढं न्हाय झेपाया त्यांस्नी."
"त्याला झेपाया न्हाई म्हनून तर खाली हैस न्हवं माझ्या. आता तूच बघ ते"
"आरं हजारपाचशाची बातंय व्हय, घरातबी नसतेत येवढं"
"सोने, आखरीचं सांगतो, चोरी कर, डाका घाल पन मला पाच लाख दे"
"उठंय उंडग्या, काय ते नंतर बघू. आता जे घ्यायला आला हाईस ते घेऊन जा"
.............................
सोळा सतराची सोनी म्हनलं तर आंगांग फुलल्याली झेंडूच जणू. पिवळ्याजर्द साडीत आगदी कात टाकलेल्या नागिनीगत चमकायची. सोताच्याच मस्तीत वळायची. खुडक बापाच्या खोकल्यानं बेजार झोपडी सोनी आसली की नागपंचमीच्या वारुळागत नटायची. जानारायेनारा वळूवळू बघायचा पन सोनी सोताच्याच नादात. चारचौघीगत कधी दिसली न्हाई की वागली न्हाई. सकाळी ट्यांकराच्या गर्दीत कधी उभारली न्हाई. रणरणत्या उन्हात हापशाला चार घागरी भरुन आणाया सोनी हमेशा तैय्यार. तंबाखू मळत बसलेल्या चार उंडग्याच्या नजरा सोनीच्या कमरेसंगं हेलकावं खायाच्या. कळशीतल्या पान्यासंगं डुचमळायच्या.
.
हापसा पार झोपडपट्टीच्या कोपर्‍याला. नाईकाच्या बंगल्याबाजूला. सोनी हापसायली की निबार कॉन्ट्रॅक्टर शिरपत नाईक ग्यालरीत मोबाईल घेऊन उभा राह्यला लागला. सोनीच्याबी दोन च्या जागी चार फेर्‍या हुवू लागल्या. तलखी वाढली न हापसा जड चालला. घामानं भरल्याली कपाळपट्टी दोनदा पुसताच नाईकानं इशारा केला. पदर ओढून सोनी आत घुसली आन बंगल्यातली मोटर चालू झाली. पाण्याचा रतीब वाढला तसा सोनीचा बाप पेटला. कोडग्या सोनीला हानून उपेग नव्हता. नाईकाकडं गेला आन हजाराच्या नोटांनी तोंड लिंपून आला. दारात एक जेसीबी, चार ट्राक्टर न कार्पिओ उभं करणार्‍या नाईकाला एक सोनी जड नव्हती. नाईकाची बाईल लग्नाच्या टाइमाला घरात गेलेली. आता तिरडीवरच दिसणार हे सार्‍या गावाला माहीती. बिनालेकराची लक्ष्मी कशी दिसती घरच्या नोकर ड्रायव्हरांना माहीत न्हाई ते सोनीला बी कधी दिसलं न्हाई.
.
झोपडीतल्या सोनीची रवानगी नीट्ट गावाभईर प्लॉटवर झाली. कधीतर चार खोल्या बांधलेल्या होत्या नाईकानं त्या सोनीच्या संसाराला साक्ष राह्यल्या. सालं गुजरली तसा हप्त्याचे चार दिवस येणारा नाईक एक दिवसावर येऊ लागला. बंगल्याची कूस रिकामी तशी प्लॉटची पण रिकामीच राह्यली. नाईकाचं येणं कमी झालं पण बंगल्याची गाडी रोज प्लॉटवर थांबायली. नाईकाचा ड्रायव्हर जयवंता चार वर्षं प्लॉटच्या खोलीबाहेर तंबाखू मळत राह्यायचा. नाईकानं दिलेला पैसा इमानदारीनं सोनीचं जोडवं बघत तिच्या हातावर टाकायचा. नाईकाच्या फेर्‍या कमी झाल्या अन जयवंताची नजर हळूहळू वर चढू लागली. दारात उभं राहून पैसे देता देता एक दिवस खोलीतल्या दिवानावर टेकला. आडदांड जयवंताला चार वर्षं खोलीत यायला लागली. त्यानंतर दोनच दिवसात तो आत आला की खोलीचं दार बंद व्ह्यायला लागलं.
................................................
मालकाची कॉर्पिओ चलवतानाचा जयवंत्या जेसीबी चलवताना मात्र बदलायचा. त्या अवजड राक्शसाला लीलया हालवायचा. दोन हायड्रालिक सपोर्ट जिमीनीवर रोवलं की शीट आलाद फिरायचं. दोन दंडक्यावर तो आर्म सोताच्या हातागत फिरायचा. रश्यात बुडवलेला भाकरचा घास उचलावा इतक्या आल्लाद बकेटीनं जिमीनीला उचलायचा. चारच बकेटात ट्रायली भरताना जयवंताला जणू भीम झाल्यागत वाटायचं. धंदा करायचा तर जेसीबीचाच हे डोस्क्यात बसलेलं. नाईक काय शेपरेट जेसीबीला उचल देनार न्हाई. हातची नोकरी गेलीतर सोन्याची खान सोनी दारात बी उभं करणार न्हाई. डिलर ५ लाखाच्या डीपीला तयार होता. एकडाव जेसीबी दारात उभारला की पैशाला तोटा न्हवता. डोळ्यास्मोर सारखं दुपारच्याला जेसीबीच्या बकेटीच्या सावलीत बसलोय आन पिवळ्या साडीतली सोनी भाकर घेऊन येतीय असंच दिसायलं.
................................................
जयवंतानं सोनीसंगं घर चाचपलं. तीसचाळीस तोळं अन तेवढेच हजार. घर तर न्हाई नावावर. नाईकाच्या केसातला अन ढगातला काळेपणा सरला. बिनालेकरानं खचलेला नाईक आता पुन्हा बरसात करनार न्हवता. त्याच्या पावसानं न उजवलेली जमीन उकरायची म्हणजे सोपं काम न्हवतं. अशात हातरुणावर खिळलेल्या नाईकाला बघायला सोनी धडकली बंगल्यावर. काय पट्टी फिरली की दोन दिवसात नाईक हसाया खेळाया लागला. प्लॉटवर कॉर्पिओची हप्त्याची नियमीत डबल फेरी सुरु झाली अन सोनीच्या गालावरली खळ भरायली. दाराभाईर कॉर्पिओत बसून मिनट मिनट मोजणारा जयवंत्या नजरंसमोर जेसीबी नाचवायचा. कल्पनेतच नाईकाला पार सपाट करुन टाकायचा लेव्हलिंगगत. जेसीबीच्या केबिनात सोनीसंगं खिदळायचा.
.................................................
स्वप्नागत दिवस सरलं आन सोनीची कूस उजवली. नाईकाच्या पैशानं तालुक्याला थाटात डिलीव्हरी झाली. कॉर्पिओतून परत येताना जयवंत्याला मधल्या शीटावर बसलेल्या सोनीच्या पदरामागचा बारका जीव देवदूतागत भासत व्हता. ह्याचं नाव जीसीबीवर रेडीयमनं करायचंच पण कवा करायचं तेवढं सुचत नव्हतं. हेंदकाळत्या गाडीसंगं जयवंत्या गुंगला की मागनं आवाज आला.
"जयवंत्या गाडी नीट बंगल्याकडं घे"
"आगं सोने, प्लॉटवर जायाचं नं, यील की म्हतारं आह्यार घेऊन. आपल्या दोघांच्या......न्हवं न्हवं तिघांच्या जेसीबीसाठी."
"गपंय उंडग्या, हाय त्यो जेशीबी बी उद्याच इकायला न्हाई लावला तर बघ. मालकाला मालक म्हनायचं आन मालकीनीला मालकीन. समाजलं का? धाकटं नाईक झोपलेत. हळू चलीव जरा"
...............................................

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पॉईंट झीरो

सैराट आन सैराटच