पोश्टरबॉईज

इलेक्शनचे पोस्टर्स, बॅनर्स, बॅजेस अन स्टीकर करुन करुन डोस्कं पार कामातनं गेलेलं. तीन पगाराचा ओव्हरटाइम काढला पण महिनाभर डोळ्यासमोर नाचलेले उमेदवारांचे ते मुर्दाड चेहरे हलायचे नाव घेईनात. पार सुम्म होऊन तीन दिवसाची सुट्टी मारली. पैला दिवस सरेस्तोवर मालकाचा फोन. "ये प्रेसला पटकन"
"जमणार नाही. इलेक्शनचे अर्जंट काम तर नीट्ट करणार नाही"
"अर्रर्र इलेक्शन आग्याद आपी. कन्नड नाटक बंदद. बर्री लगोलगो."
अरारारारा. चला उठा राष्ट्रवीर हो.
प्रेससमोर दोन ४७४७ बोलेरो लागलेल्या.
आत जाताच मालकाने जावई असल्यागत माझी ओळख करुन दिली. "इदे नोडरी डिझाइनर. हेळ सावकारु येन्बेकु"
एक कार्यकर्ता लगेच "येन्स्वामी, आरामरी?" करुन सलगी दाखवता झाला.
"मालक ह्याना सांगा मला कन्नड येत नाही, परत तरास नको" हा व्युहाचा सुरुवातीचा भाग.
"चालतयरी कलाकार, पर्वा इल्ला, स्टार्ट मारा तुमी. आमाला
येतय की तुमचं मराठी तोडंतोडं"
"द्या आप्पा मजकूर?
"मजगूर? येनु?"
"कागद ओ. लिव्हलेला"
"ते म्हणता व्हय. आद आद. तगोरी"
मजकूर म्हणजे हे भल्या मोठ्या ड्रॉईंग शीटवर चार पाच फोटो चिकटवलेले. स्केचपेननी बॉर्डर वगैरे काढून पार गिचमिड काला केलेला. अर्धे कन्नड, थोडे मराठी आन उरलेसुरले इंग्लिश भाषेतल्या अक्षरांनी केलेले अ‍ॅबस्ट्रॅक्ट जणू
"हेसरु येनु?"
चुकुन माझ्या तोंडातून कन्नड जातेच. हळूच सावरुन नाटकाचे नाव काय विचारतो.
"ते बगा 'मांगल्य यारदु नि मडदी यारीगे"
"?"
"पुढे लिव्हा मत्तु कुंकुम तंद सौभाग्य"
"म्हणजे?"
"ते बायको कुणाची आन झोपती कुनासंगट हो"
मी खुर्चीतच पडायचा बाकी. च्यायला असले नाटक.
नंतरच्या तीन तासाच्या घमासान कानडी परिसंवादातून कळलेली माहीती अशी. सीमेवरच्या गावात ह्या मल्टीलॅन्ग्वल नाटकांना लै डिमांड. हा तीन तीन दिवस चालणारा प्रोग्राम असतो. हिरोईन, डान्सर, एक कॉमेडीयन आणि म्युझिक पार्टी बाहेरची असते. बाकी सगळी कास्ट गावातलीच. हिरोपेक्षा व्हिलनच्या रोलला जादा डिमांड. स्टाइल आणि डान्सरसोबत ठुमके मारायला मिळतात. हा रोल बहुधा पाटलाचा किंवा सरपंचाचा पोरगाच करतो. त्याची वर्गणी सगळ्यात जास्त असते, रोजचा सराव असतोच शिवाय हौस दांडगी. बाहेर थांबलेल्या दोन्ही बोलेरो बहुतेक त्याच्याच असतात. हिरो म्हणजे सेकंड पोस्ट. त्यालाही डिमांड असते पण जरा कमीच. पोलीस भरतीत वारंवार नापास होऊन इन्सपेक्टर व्हायची तमन्ना इथे पूर्ण करायची असते. हिरोचा मित्र हा सात्विक दिसणारा, शालेय भाषणस्पर्धेत बक्षीस मिळवणारा होतकरु तरूण असतो. बाकी हिरो हिरवीनीचे आइबाप, गावकरी, पुजारी, अशी पात्रे वर्गणी आणि वकूबानुसार गावकर्‍यांनी वाटून घेतलेली असतात. यात्रेआधीच एक महिना बाहेरच्या कलावंत मंडळींना ही सुपारी दिलेली असते. त्यांनी दिलेल्या स्क्रीप्ट (संहिता हा शुध्द शब्द ऐकायला मिळाला चक्क) नुसार तालमी चालू असतात. आम्ही सांभाळून घेऊ अशी बोली असल्याने ह्या तालमीत केवळ सपाट पाठांतर एवढेच झालेले असते. आता नाटकाची जाहीरात करणे जरुरी झालेले असते. त्यासाठी ही मंडळी आमचे सामान्य ज्ञान वाढवित असतात.
एका पाकिटात मोठ्या साइजचे २०-२५ आणि पासपोर्ट साइजचे ७०-८० फोटो. मोठे फोटो गावतल्या हौशी फोटोग्राफरने पार गुळगुळीत आणि लग्न जमवायच्या हेतूनेच मेकपलेले. बारक्या फोटोत मात्र फुल्ल व्हरायटी. शाळेच्या आयकार्डापासून व्होटर्सकार्डपर्यंत सगळे नमुने. ते एका ऑपरेटरला स्कॅन करायला दिले. कन्नड मजकूर दुसर्‍या एका ऑपरेटरला टाइप करायला दिला. त्याची पाठ धरुन लगेच एक शाळामास्तर बसलाच. कानडी असो की मराठी, लेटेस्ट शाळामास्तर एका साचातले. पेपरातले वाक्यप्रचार आणि काही सरकारी शब्द इतकीच शब्दसंपदा सर घेऊन प्रुफरिडींगला बसले.
आता महत्त्वाचा विषय लेआउट.
पोस्टरसाईज डेमी. साधारण दीड बाय दोन फूट. वरच्या साईडला बसवेश्वर, जवळचे एखादे जागृत देवस्थान, ग्रामदैवत, नटराज आणि सिध्देश्वर मस्ट. सगळ्यांना श्री प्रसन्न करुन खाली महाराज मंडळी. ह्या मठाचे, त्या मठाचे, ब्रह्मचारी, आचार्य वगैरे सगळे भगवे वस्त्र मुकुट आणि दाढीधारी. त्यातले काही सिध्द कॅटेगरीतले. फोटोशॉपात मागची प्रभावळ करणे मस्ट. नंतर क्रम नाट्यमंडळीच्या नावाचा. त्यात भरती गायनाचार्य आणि संगीताचार्यांची.
"ओ आर्टिस्ट, खानेका क्या करते?"
"गडबडीत डबा नाही आणला मी."
"चला निघा ओ. थोडं टिफिन मागवू हितं. अस करु चला बाहेरच. तवर आमचं नेते येतेतच ओ. आता मेन काम सुरुच करा की. थोडं सिग्रेट बिग्रेट घ्या तुमी. आपल्या कामात फ्रेश राह्यचं बगा"
त्यांच्या सोबतचं पब्लिक दर १५ मिनिटाला कुठं जाउन फ्रेश होत होतं कळलं.
बाहेर जाउन सोलापूरातही कामतच सापडावे ह्यांना. एका बेचव थाळीच्या बिलापोटी ह्यांच्या सरपंचानी हिरॉइन आणि डान्सर कशी बुक केली ह्याची रसभरीत स्टोरी ऐकून मी ह्या जाहिरातनाटकाचा पुढचा प्रयोग सजवायला सज्ज झालो.
जेवणंखाणं उरकून २ तास झाले. प्रेस बंद करायची वेळ आली तरी नेत्यांचा पत्ता नाही. कार्यकर्त्यांचे फोनवर फोन चालू होते. कंटाळून आता उरलेल्या कामाला उद्या या असे सांगून पीसी बंद केला आणि निघालो. दरवाजातच स्कॉर्पिओला अडलो. पांढर्‍या लिननच्या ताग्यात गुंडाळलेले आणि सोन्याने मढलेले एक वजनदार प्रकरण बॅकसीटवरुन उतरत होते. पांढर्‍याच लेदरच्या चपला आणि हातातले राडो. जडावलेले डोळे आणी इंग्लिश प्लस सेंटचा उग्र वास. गप्प गाडी परत लावली आणि येऊन पीसी चालू केला. झालेल्या कामाचा आढावा सरलोकांनी नेहमीच्या सफाइने दिला.
"हे बग, नाळ मुंजाळे येयाचं जल्दी. नाईटला पोस्टर पायजे. आता निग"
इतका हुकूम मिळाला की परत आवरुन निघेपर्यंत नेते आणि कार्यकर्त्यांची नाईट कुठे याची सुश्राव्य चर्चा ऐकायला मिळाली.
.........................................
सकाळी सकाळी प्रेसमध्ये माझ्या आधी कार्यकर्ते हजर. आज जरा संख्या वाढलेली. माझ्या मागून तिन्ही बाजूने तिन्ही भाषांमधून सूचनांचा भडीमार चालू झाला. पोस्टरवरच्या फोटोत साहेबांना त्यांची स्कॉर्पिओ दिसायला हवी होती. साहेबांच्या पोराचे म्हणजे व्हिलनचे फोटोत कपडे आणि शरीर फारच सुरकुतलेले दिसत होते. हिरॉइनच्या अंगावरचे कपडे त्या पोजला शोभत नव्हते (हे साहेबांचे स्पेशल मत) हिरोचा पोलिस ड्रेस ओघळलेला आणि बहुरुप्याची कळा दाखवणारा होता. व्हिलनचे सोबती नुसते हातात बंदुका घेतल्याची अ‍ॅक्शन करुन उभे होते. कॉमेडिअनचे फोटो त्यातल्या त्यात सरस होते.
शेवटी मदतीला येणार इंटरनेटच हो. विष्णुवर्धनच्या कुठल्याश्या पिक्चरमधली डॅशिंगपणे चालत येणारी कानडी इन्स्पेक्टरची पोज हिरोच्या तोंडाला बसवण्यात आली. राहुल देवची पिळदार बॉडी व्हिलनने उधार घेतली. वजनी डान्सर मुमैतखानच्या अदावर थिरकली. हिरोईनचे कपडे मात्र स्वतः साहेबानी दिलेल्या फोटोनुसार सुधारण्यात आले. लेआउटात उरलेल्या बाजूला मिळतील तसे इतर कलाकार कोंबण्यात आले. पोस्टरच्या दोन्ही बाजूला हिरो आणि व्हिलन पेटलेल्या जाळाच्या पार्श्वभूमीवर चालत येत होते. रोहित शेट्टीने उडवलेल्या गाड्याच्या पार्श्वभूमीवर स्कॉर्पिओ आपली ४७४७ नंबर दिमाखात दाखवत होती. डिस्को लाईटसच्या प्रकाशात डान्सर चमकत होती. इतक्या सगळ्या गोंधळात नाटकाचे नाव कुठेय अन त्यातला संसार कुठेय हा प्रश्न मात्र विचारायचा राहिलाच.
पोस्टर आता ८० टक्के पूर्ण भरत आलेले. खालची बाजू सौजन्याची. अर्थात देणगीदारांची. देणगीच्या आ़कड्यानुसार क्रम लावित १०-१२ महांतेश, ७-८ श्रीशैल आणि बरेचसे गौडा लावले गेले. अगदी खालच्या पट्टीत नाटकाची वेळ, स्थळ आणि प्रेसलाईन टाकली आणि प्रुफ रिडिंगला देईपर्यंत संध्याकाळ झाली. इतक्या सहवासात बराचश्या कार्यकर्त्यांना फोटोशॉपचे चमत्कार पाहून माझ्या मोठेपणाची खात्री पटलेली. नाटकाला अवश्य या, साहेब सगळी सोय करतील असा आग्रह वारंवार झाला. डिझाइन प्रिंटिंगला गेले आणि मी ह्या कानडी व्यापातून जरा मोकळा झालो.
.....................................
दोन आठ्वड्यानी हा विषय डोक्यातून पूर्ण विसरलेला. मालकानेच आठवण करुन दिली. "अरे ते नाटकाला तुला बोलावलेय बघ. रात्री असतंय. मज्जा असती फुल्ल. इथले काम संपवून जाउन या उद्या"
शेतात रस्ता की रस्त्यात शेत असा ५० कीमी प्रवास करीत आम्ही चौघे रात्री १० च्या सुमाराला गावात पोहोचलो. गावची यात्रा असल्याने झगमगाट सगळीकडेच दिसत होता. साहेबांच्या लॉजवर खाण्यापिण्यांची जय्यत तयारी होती. जावयाचा होणार नाही इतका पाहुणचार सोसून नाटकाच्या ठिकाणी पोहोचलो. अगणित स्पीकर कन्नड भाषेतली गाणी बोंबलत होते. आम्हीच केलेले पोस्टर गावभर लावलेले दिसत होते. नाटकाच्या ठिकाणी खास पाहुण्यांच्या सोफ्यावर जागा मिळून समोरचा गोंधळ पाहत बसलो.
रंगमंचाचे पूजन, दिवाबत्ती, आशिर्वादी आचार्य आणि नेत्यांचे सत्कार वगैरे आटोपून प्रत्यक्ष नाटक सुरु व्हायला तास गेला.
गरीब घरातला हिरो, त्याचे आईबाप आणि इतर गावकरी यांच्या संवादातून काहीही कळत नव्हते. अभिनय वगैरे तर सोडा पाण्यात पावडर कालवून रंगवलेले भयाण चेहरे आणि ओरडून म्हणलेले संवाद हेच नाटक होते. जरासे प्रेक्षक बोअर झाले की कॉमेडिअन येउन काहीतरी विदूषकी चाळे करुन जात होता. तेवढ्याने प्रेक्षकांचे समाधान झाले नाही की डान्सर येऊन हिंदी गाण्यावर ठुमके मारुन बेफाट नाचून जात होती. हिंदी, कन्नड पिक्चरच्या संवादांची उजळणी वारंवार होत होती. एकाचे संवाद चालू असता बाकीचे कलाकारांची गप्प मान खाली घालून उभे राहण्याची पध्दत तर अप्रतिम अशीच होती. स्वतःचे लग्न असल्यासारखे नटलेल्या व्हिलनने डान्सरशी केलेल्या माफक अंगचटीला तुफान शिट्ट्या पडत होत्या. कधीतरी मध्येच रंगमंचावर दोन बुलेट, एक घोडा आणि स्कॉरपिओ पण चक्कर मारुन गेली. आता अजून काय दाखवणारेत ह्या अपेक्षेत असताना क्लायमॅक्स आला. सगळ्या पात्रांच्या उपस्थितीत हिरोने अगदी जंटलमेनपणे व्हिलनला बेड्या चढवल्या. व्हिलनसाहेब बेड्या आणि हिरोला घेउन थाटात एक्झिट करते झाले आणि नाटकाचा धी एंड झालेला आम्हाला समजला.
.....................................
पहाटे कधी घरी अलो आणि झोप लागली हे कळाले पण नाही. रात्रभर कानात अगम्य खडखड होत होती. सकाळी जाग आली ती आमच्या मालकाच्या फोनने.
"आवडले का रे नाटक. पोस्टरचे भारी झालेले आपले काम. ते बघून अजून एक पार्टी आलीय पोस्टर छापायला. ये पटकन"
"आलोच" म्हणत आवरायला सुरुवात केली.
.....................................
(समाप्त)

Comments

Popular posts from this blog

सैराट आन सैराटच

मालकीण

पॉईंट झीरो