जी नाईन

रस्त्यात कालवा इतका झाला की शंकर्‍या उठलाच. खाटेवर टेकलेल्या बूडाचा आधार घेउनच अशी गिरकी फिरली की पाय खाटेखालच्या बुटावर आले. स्लीव्हलेस टीशर्टाचे खांद्यावरचे दोन कोपरे बोटाच्या चिमटीत पकडले गेले. एक हिसका देऊन दोन्ही हात सवयीने कानावरच्या केसातून फिरले. हात फिरले म्हणण्यापेक्षा हात जागेवर राह्यले, मान पुढे मागे झाली. बुटाची चेन ओढली गेली. मोरीतल्या पाण्याचा हबका तोंडावर बसला तसे ते ओले हात परत एकदा केसावर फिरवून शंकर्‍या खोलीबाहेर पडला.
रस्त्यावर नेहमीचाच सीन. मामाच्या कॅन्टीनसमोर एक अ‍ॅक्टीव्हा आडवी पडलेली. टिपटाप युनिफॉर्मातला एक गोमटा जीव मम्मी कशी रिक्षावाल्याशी भांडतेय हे पाहतोय. रिक्षावाला तर गल्लीतला सत्याच होता. गर्दीला आवडणारा परफॉर्मन्स अगदी बिनचूक पार पडला जात होता. शंकर्‍याने गर्दीत घुसताच आवाज दिला. "अय मॅडम, जरा तमीजसे बात करना. गरीब हुये तो भी इन्सान है हम" भांडून त्रासलेल्या अन शिव्याचा स्टॉक संपल्याने गोंधळलेल्या मॅडमने शंकर्‍याकडे पाहिले. गर्दीने हसायला सुरुवात केलीच होती ती आता नवीन सीनसाठी सरसावली.
"अरे ये तो नीलम है. क्या मॅडम पहचाना की नही. अपुन शंकर. जीनाईन."
"शंकर्‍या, सोड आता तरी मवालीगिरी. बघ ह्या रिक्षावाल्याने काय केलेय, त्यात अथर्वला स्कूलला लेट होतय"
..........
"ए हटा, सब हटा. सत्या चल बे. फूट इथून. अपना पुराना वास्ता है" एवढे बोलत पडलेल्या अ‍ॅक्टीव्हाला शंकर्‍याने हात घातला. च्यायला जड होतं प्रकरण. का हाडं कटकटायली. जरा दम लावून उचलताच नीलमने हिसकावल्यासारखा ताबा घेतला. मम्मीने बटनस्टार्ट करायच्या आत पोरगं मागच्या सीटवरुन तिला बिलगलं.
गर्दीचा इंटरेस्ट संपला होता. शंकर्‍या सत्याला घेउन कॅन्टींगात टेकला.
"यार वो नीलम है. अपने साबकी. बहोत पुराना लफडा. कारसे आती थी इस्कूल. आपुन उदरीइच रुकता था उसके वास्ते"
"बस कर बे, उठला आता बाजार तुझा आन तिचा पण. तिचं गाबडं दोन चार वरशात दहावीला येईल. तू आइघाल्या कवा आतनं शाळा तर पाह्यला का?"
"सत्या, मेहनत करके रिक्षापे जीता है इसलिये माफ किया तेरेकू. साले कहा नोकरी करता तो नही छोडता मांकसम"
"आता गप्पतो का भाऊ. तिच्यायला त्या मिथुननं हेंडगाळ लावलं जिंदगीला. ते बी सोडंना ठुमकं लावायचं. तुझी जवानी उतरना."
"क्या बोलता? दादाकी नयी फिल्म? "
"बस ना आता. रात्री आसतय टीव्हीवर. डॅन्सच्या शोला. केबलवर"
"दादा का डॅन्स. मांकसम. पण सत्या टीव्ही नाय ना आपल्याकडे"
"टीव्ही नाय, बीवी नाय, कुच बी नाय तुझ्याकडं गांडो. जिंदगी सगळी जीनाईन करत घाल त्या टेपमदी."
"टेपला काय बोलायचं नाय बे सत्या. जिंदगी हाय अपनी. ते जौंदे. शंभर दे की जरा."
"भाडखाव, भोनीचा पत्ता नाय ती तुझी बुढ्डी ठोकली सकाळ सकाळी. पैसे कुठनं आणू. आधीचे हजार दे परत. ग्यास भरायचाय"
"चल माफ कर दिया. मामा, अपना दो चाय लिख देना खातेपे"
"निघंय फुकन्या. इथून तिथून, सम्दं मिथुन. पुढं मागं कोन नाय तवा बोलंना तुला. न्हायतर कुत्रं इचारना तुला"
मामा लैच कोकलायच्या आत शंकर्‍या रुमवर आला. कालच्या २० रुपड्याच्या भज्याचा पुडा तसाच पडलेला. टेपची कॅसेट अर्धवट बाहेर आलेल्या जिभेगत रेकॉर्डरच्या तोंडातून लोंबत होती. खाटखाट बटनं दाबत कॅसेट बसताच शंकर्‍यानं भजी घेउन ठिय्या मारला.
जिहाले मस्ती मुकं ब रंजिश सुरु व्हायच्या आधीचा मॅडम बस चली जायेगी चा पुकारा शंकर्‍यानं जोरात केला पण आवाज साथ देईना. आवाज काय आख्खं शरीर तुटल्यासारखं झालेलं.
सालं ह्या जिंदगीला आपली जरुरत नाय. दादा अजुन फॉर्मात हायेत. उटीला कायतरी हॉटेलं हायत म्हणं. इंडस्ट्रीको जरुरत है दादाकी. बस अपनी जरुरत नही किसिको.
कळायला लागल्यापासून लागलेला नाद पिक्चरच. तवा बी आय होती, बाप नव्हता. रस्त्यावर सुध्दा डिस्को मारत जाणारा शंकर्‍या काहीही करुन जगत गेला. वाढत्या वयासोबत अक्कल मात्र मिथुनखाती गहाण पडत गेली. आय गेली ती शरीर वाढायची किल्लीच घेऊन गेली. भजीपाव भरुन अंगावर ना मांस भरणार होतं ना चमक. चमक राह्यली ती फक्त घोट्याच्या वर असलेल्या चेनच्या बुटाला. थेटर, व्हीडीओ जमंल तिथं शंकर्‍या मिथुनला डोळ्यात, मनात साठवत राह्यला. एकाच गोष्टीसाठी आईची आठवण काढत राह्यला ते म्हणजे ठेवलेले नाव शंकर. दादाच्या पिक्चरात हमखास असतंच. गरीबोंका दाता शंकर. बुराइका दुश्मन शंकर.
साला शंकर शंकर शंकर. त्याआधी जिम्मी म्हणायचे यारदोस्त. नंतर जी नाईन झालं.
जी नाईन. कमांडोतला मिथुनदा जी नाईन.
त्या नावाबरोबर स्वप्नात मंदाकीनी दिसायली तेव्हा शंकर्‍याची जवानी सुरु झाली बहुतेक.
एकदा मंदाकीनीचे घारे डोळे दिसले शाळेच्या युनिफॉर्मात. तेंव्हा शंकर्‍या सत्याची रिक्षा चालवत होता. दहावीची नीलम पीएसअयसाह्यबाची पोरगी आहे हे कळलं तसं शंकर्‍या खुलला. भ्रष्ट पोलीस अधिकारी बापाच्या तावडीतून नीलमला सोडवतोय अशी स्वप्ने तर कायमच पडायली. रात्री फुटकी फरशी रंगीत काचात बदलायची. पांढर्‍या उंच टाचाच्या बुटातला शंकर्‍या डिस्कोच्या तालावर स्वप्ने रंगवायचा. रुपाया रुपाय जोडून ड्रायरने सेटींग केलेले केस मिंटामिंटाला हाताने सेट करायचा. नीलमला बघायला शाळेच्या पायर्‍या झिजवून झाल्या. तिच्या घरासमोरचा कट्टा घासला. तिच्या बापाकडं ड्रायव्हरची नोकरीपण करुन झाली. नाचरे दिवस सरत गेले. नीलम कॉलेज बिलेज करुन सुखाने बोहल्यावर गेली. त्या लग्नात नाचायची सुपारी मात्र शंकर्‍याने नाकारली.
इतक्या दिवसात शंकर्‍या पोराचा बाप्या झालेला. जीवापाड सांभाळलेल्या केसांनी साथ सोडायला सुरवात केली. फिटींगच्या पांढर्‍या पॅन्ट आणि लूज टीशर्ट विटले. उंच बुटांसोबत जिंदगीपण घासून सपाट झाली. लग्नकार्यात नाचून नायतर ऑर्केस्ट्रात नाईटवर मिळालेल्या पैशात टेप न कॅसेटी एवढीच इस्टेट जमा झालेली. खोली तर आयच्या नावावर. ती पण जाणारच अतिक्रमणात एक दिवस.
"साला गरीबोंकी नही ये दुनिया. अपनी प्रेमप्रतिज्ञा ऐसेइच जायेंगी अपने साथ"
"नीलमचं पोरगं मोठ्ठं झालं. अपना दादा बडा आदमी बन गया. अपना क्या? "
"डॅन्स. बस्स डॅन्स."
"आयामे डिस्को डॅन्सर."
"नये लडकोंका डॅन्स जज करते है अपने दादा. अपुन जानेका क्या?"
"जानेकाच. दादा समझ लेंगे अपनी जिंदगी"
दुखर्‍या पाठीला अन भरुन आलेल्या पोटर्‍यांना सांभाळत डोक्याला रुमालाची पट्टी आवळून शंकर्‍याने टेपचा आवाज वाढवला.
"जिंदगी मेरा गाना, मै कीसीका दिवाना. तो झूमो, तो नाचो, आ मेरे साथ नाचो गावो. आयमे डिस्को डॅन्सर"
.
.
दुपारपर्यंत टेप वाजत राहिला. कॅसेट साईड बदलत राहिल्या. पाय थिरकत राह्यले.
.
.
संध्याकाळी सत्या पैसे द्यायला आला. भजी अन तुटक्या कॅसेटीच्या राड्यात डॅन्स संपला होता.
पत्र्याच्या त्या खोलीत जिवंत असलेला एकमेव जीव म्हण्जे तुटक्या रीळाच्या कॅसेटचा टेप फिरत होता.
.................................

Comments

Popular posts from this blog

सैराट आन सैराटच

मालकीण

पॉईंट झीरो