बाप हाय मी

"बरं मग वकीलसाहेब, आलं समदं ध्यानात? ह्येच्यापुढं मी काय सांगू नये, तुमी इचारु नये"
"लका, वकीलसाहेब झालो नंतर, आधी जिगरयार हौत. चड्डी घालता येत नव्हती तवापासून दोस्ती आपली"
"म्हणूनच. म्हणूनच... चल लाग आता कामाला, लै लेट बी झालाय, वैनीसाब वराडतील"
"झोप तू बी. डोळे लेन्स लावल्यागत झालेत लालभडाक"
"झोपेचं तेवढं सोडून बोल. ती ग्येली आता कायमची, निघ तू"
.................
"नाग्या, सगळं घीवून ये बे वर"
"मालक, वैनीसाब येते म्हणतेत वर, कसं करु?"
"झोपा म्हनाव त्येंना. तू ये घीवून. च्यायचं आकरामाशी"
**************************
तिज्यायला कोनाय बे आकरामाशी. कोन म्हणतंय? समोर ये उंडग्या. नाही उभा जाळला तर पाटलाचं रगात नाय सांगणार.
ए नाग्या.... कुठं पळाला? आकरामाशी औलाद पळालीच का अशी? आनतो का आता?
आन आन. भर नीट.
नीट भर आयगल्या. नीट.
हां. चल निघ. भईर थांबायचं. चल.
....
.रामराम पाटील. कसं चाल्लंय? लै भारी वाटतंया आं बसून दारु प्याया?
प्या...प्या. आपल्याच कारखान्याची गेलेली आसंल तिकडं. तितंबी रिमिक्स करतील आयगले.
तसं न्हवं..कलर लैच उतरल्यासारका वाटतय.
कुनाचा? आं? कुनाचा?
न्हाई म्या म्हणलो ओ...माननीय माजी आमदार श्री. तात्याराव पाटील.
कसं वाटतंय? आँ.... माजी. थुततिच्यायला. फुकाट नाय झालो भौ आमदार. लगी माजी?
चौथीला होतो तवा जप्ती आलेली डीसीसीची शेतावर. आजा पाया पडायलेला साह्यबाच्या. आदी शेत खायला समदे आलेले आता भावकीतला एक किडा उठला नाय तिज्यायला. आकरामाशी म्हणत व्हती त्या टायमाला आमच्या आज्याला. त्येनं कवा कुटं शेण खाल्ल्यालं पण डाग पडलेलाच. तवाच बाप उठला तिरीमीरीत. धरला हाताला आन म्हनला चल दाखवू पाटलाचं रगात कसं घट्ट हाय ते. पंध्रा वर्स राबला कुत्र्यागत तवा १० एकराचा तुकडा कोरा झाला. शिकिवला मात्र नेटानं आमाला. तालुक्याला कॉलेज केलं संगाट राजकारण बी केलं. खानदानी रक्तय आपलं एवढं कधी इसारलो न्हाय. रुप आन जिगर बघून साह्यबानी घेतलाच ग्रामपंचायतीवर. सदस्याचा सरपंच झालो आन सरपंचाचा आमदार. फुकाट नाय झालो. पानी केलो रक्ताचं पानी.
**************************
"नाग्या............पानी आन बे"
"मालक, बघवंना ओ मला. काय एकटाच बसला बोलत आरश्याम्होरं?"
"ए...चल नीघ, एकटाच है आपण. बास्स्स्स. एकटाच. चल नीघ तू"
**************************
हां तर पाटील. काय सांगत होतो म्या? ते आमदारकीचं. कारखाना उभारला की तेच्या आधी. इक्रमी येळेत हां..इक्रमी येळेत. साहेब आलेले उद्घाटनाला. तात्या एकटाच तरणाबांड वाघंय इलाक्यातला म्हणलेले. हायंच आपण. आपली सोयरीक बी बापानं अशी धरली की नादच करायचा न्हाइ. शाण्णव मंजी शाण्णव. बापानं कधी राजकारण न्हाई केलं आपल्या पन आडा़खे न्हाई चुकले. लग्नाला सोता शीएम, बारा कॅबिनेट आन चाळीस आमदारं जेवून गेलेली. नंतर बी तीनचार येळेला आलेलं साह्यब. रातच्याला हितंच फार्म हाउसावर बसायची मिटींग. शीएम तर आपल्या फडावर आन केळ्याच्या बागंवर काय खुश लका. आर्ची बारकी व्हती तवा. सोता साहेब म्हणलेले. आगामी मिनिस्टर हायेत ह्या. च्यायला तवा बी शीएमची कॉलर पकडलेली आर्चीनं. रक्तातंच व तिच्या. पायजेल ते मिळीवणारच. जन्मली तवा लै तरास दिली. रातरातभर आमदारकी इसरुन खांद्यावर खेळवलेलं आर्चीला. तवापासून राहयली न्हाय कधी सोडून मला.
खरंच राह्यली न्हाई माझ्याबिगर. तिच्यानंतर पोरगं झालं पण जिगर म्हणली तर आर्चीच. फार्महाउसला तिचं नाव दिलं तवा कसली नाचली. वरची रुम पार फॉरीनगत सजवून दिलेली. सोताबी पाउल न्हाय टाकलं तिच्या परमीशनबिगर.
बुलेट दिलेली प्रिन्श्याला पण चलवायची हिच. ट्र्याक्टर बी चलवली तरी आपला फुल्ल पाठिंबा व्हता ओ.
.......................
तिच्यायला पलटलं कुटं?
कुटं कमी पडलाव आमी?
व्ह्य गं आर्चे...आं? कमी पडलाव का कधी कशात?
मी म्हणतो केल्या का कधी तुझ्या बापानं अपेक्षा? तू जे करंल ते खरं म्हणलं ना नाय? सगळ्याच्या अपेक्षाच पूर्ण करत चालली ओ जिंदगी. ह्ये तुझ्या परशाचा बाप. जिंदगीभर झटला आसता तरी मिळाला असता का ठेका धरनाचा? हितं बंगल्यावर येऊन पाय धरला तवा मच्छीमार सोसायटी काढून नाव घीवून दिली. ती नाव घीवूनच उडला का नाय आमच्यावर?
तू म्हणली शिकती. आडिवली का तुला? नसंना का मार्क? डीग्री तर व्हतीच की हक्काची. कॉलेज आपलंच होतं की. आं. प्रिन्सराजेनी वाजवली त्या मास्तराला. बोललं का कुणी त्येन्ला?
तू मंग्याला आडवली. पोरांना बी नडायची. काय झालं का कदी?
कशाला बी न्हाइ म्हनलं न्हाइ पोरी तुला..........एकदा तर इचार करायचा बापाचा.
काय मिळीवणार हुतीस आं?
बापाची मान खाली गेली की लै सुख लागतं का?
आगं ही मान वर करायला चाळीस वर्श खपलाय हा बाप.
हेच्या पुढच्या इलेक्शनला महिला राखीवची हवा होती. सगळ्यात तरुण आमदार म्हणून थाटात विधानसभेत गेली आसती.
हायेच तेवढी पुण्याई आपली.
तुला तेवढीच जड झाली व्हय? आं.
राजवर्धनराजेंचं स्थळ तर फक्त तुझ्यासाठी थांबलेलं. दहांदा इचारलेलं. म्या म्हणलं आमदार अर्चना पाटील होणार आन मगच समदं. कुटं लागावा तुझा परश्या त्येंच्यापुढं.
तरी घरच्याना दहांदा सांगितलेलं. लक्ष असुंद्या, लक्ष असुंद्या.
घरचा भेदी निघाला तिज्यायला मंग्या.
बापाचा हुंदे येळ्कोट. भावाकडं तरी बघायचं. भैन सांभाळता येईना आन तालुका काय संभाळनारे म्हनून शेण खायची येळ आनली.
तू कसाबी कर गं संसार. पण सोताच्या घरावर का निखारा ठेवतीस आं.
न्हाई चलायचं.
डोळ्यात तेल घालून राखलेली येल आपली. कुठला काटा खुपला ग तुला. फुलून डोलायलीस त्येचा अभिमान करस्तवर आल्लाद खूडून घेउन गेला त्ये कडू.
म्या तर म्हणतो तुलाच कसं काय न्हाय वाटलं? आं.
समदं इसरली?
न्हाई चलायचं अज्याबात.
तुला नाही ना किंमत आमची आर्चे? नाही ना कळत आयबापाचं काळीज? असुंदे. कळंल ना एकदिवस.
राहतीस न्हवं सुखानं? राहा. पण एक घर इस्कटून दुसरं न्हाई उभं करायचं. मला चलणार न्हाई ते.
माझ्या घरावर नांगर फिरीवला तर त्येला उखडून काढनारच. कोन का आसंना.
आं.. काय म्हंतीस? तुमचंच रक्त?
हॅटतिज्यायला. तू इसरलीस रक्ताला. आमी न्हाय.
................
लै तरास दिला गं आर्चे. लै जळला बघ जीव.
टाकलं संपवून एकदाचच. न्हाई जळनार आता.
माफ कर बापाला तुझ्या. जमलं तेवढं केलं.
सोताच रक्ताचा खेळ मांडला बी आन इस्कटला बी सोताच.
तुझा भाव हाय रक्ताचा. जमल तसं करंल आन निस्तरल.
म्या लावली बघ सगळी सोय.
सगळं आगदी रितीरिवाजानं केलंय बरका. आपला खानदानी रिवाज न्हाई इसरायचा.
घेतला बरका सगळा गुन्हा, सगळा घेतला अंगावर. तुझ्या भावावर कायबी येणार न्हाई. सगळं केलय सेटींग.
तुझं लेकरु बी राहील त्येच्या नशीबानं. त्येचं जेवढं त्येवढं आपलं वकीलकाका पोहोच करतील.
म्या काय न्हाय थांबत इथं. इस्काटलं बघ सारं हातानीच. जगणं संपलं ह्या पाटलाचं.
वेव्हार निस्तरला, जीव अडकलेला तुझ्यात.
नाही जमत माझी माय. न्हाई जमत.
बाप हाय गं मी.
**************************
(समाप्त)
..................
..................
..................
(समदी पात्रं ओळखीची वाटली असली तरी खेळ सारा मनाचा. इस्कटलेल्या खेळाच्या ह्या कहाणीला कुठलाबी खुलासा न्हाई की समर्थन न्हाई)

Comments

Popular posts from this blog

सैराट आन सैराटच

मालकीण

पॉईंट झीरो